डॉ सिसिलिया यांचा जन्म 23 एप्रिल 1956 रोजी वसई येथे झाला. मराठी भाषक रोमन कॅथोलिक ख्रिस्ती कुटुंबात येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार उच्च मूल्यांचे संस्कार त्यांच्यावर झाले. अनेक प्रकारच्या संघर्षातून शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. आईवडलांकडून मिळालेला संवेदनशीलतेचा वारसा, वसईचा इतिहास आणि सुरम्य निसर्ग तसेच आंतरधर्मीय सुसंवादाचा धागा, अभ्यास, संशोधन यातून लेखनास प्रेरणा मिळाली.
डॉ सिसिलिया कार्व्हालो यांचे शालेय शिक्षण निर्मला माता मुलींची शाळा माणिकपूर वसई येथील मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. 1973 साली मॅट्रिकच्या परीक्षेत विद्यालयातून प्रथम वर्गात सर्वप्रथम आल्याने त्यांना तत्कालीन शिष्यवृत्त्या मिळाल्या.
1977 यावर्षी ‘विद्यावर्धिनी’ संचालित अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातून मराठी आणि मानसशास्त्र या विषयात B.A. पदवी प्राप्त केली. 1979 साली मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात M.A. पदवी प्राप्त झाली. 1980 मध्ये मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या हिंदूजा महाविद्यालयातून D.H.E(Diploma in Higher Education) ही पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. 1988 साली M.Phil या पदवीसाठी डॉ. सरोजिनी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पंडिता रमाबाई यांचे समग्र साहित्य‘ या विषयावर मुंबई विद्यापीठाला शोधनिबंध सादर केला आणि ती पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. 1998 साली ‘ज्ञानोदय’मधील निबंध- निबंध वाङ्मयाचा पूर्वरंग (1842-1874) या विषयावरील प्रबंधाचे लेखन डॉ. उषा माधव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आणि विद्यावाचस्पती (Ph.D) ही पदवी प्राप्त केली. मुंबई विद्यापीठाचे उच्चविद्याविभूषित असे हे व्यक्तिमत्त्व आहे.
डॉ सिसिलिया कार्व्हालो यांनी 1980 ते 1992 या काळात अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय येथे कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन केले. 1992 साली संत गोन्सालो गार्सिया या महाविद्यालयात मराठी विषयाच्या अध्यापक म्हणून त्या रुजू झाल्या. चर्चप्रणित या महाविद्यालयात 2013 ते 2018 या काळात त्यांनी प्राचार्यपद भूषविले आणि 2018साली प्राचार्य म्हणून सन्मानपूर्वक निवृत्त झाल्या.
1992 ते 2018 या कालावधीत मुंबई विद्यापीठात त्यांनी M.A, M.Phil च्या विद्यार्थ्यांसाठी मराठीचे अध्यापन तर त्यांनी केलेच, परंतु 2005 पासून Ph.D साठी मार्गदर्शक म्हणून मुंबई विद्यापीठाची मान्यता मिळाल्यावर आणि Ph.D साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी डॉ सिसिलिया कार्व्हालो यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली आपले प्रबंध लेखन यशस्वीरित्या पूर्ण करून Ph.D पदवी प्रमाणपत्र प्राप्त केले .
प्राध्यापकांसाठी आवश्यक असलेले उद्बोधन वर्ग (Refesher Courses) त्यांनी पुणे विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ आणि महिला विद्यापीठ, मुंबई येथे पूर्ण केले विविध विद्यापीठात त्यांनी साधारणपणे पन्नास शोधनिबंध सादर केलेले आहेत. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर, गुजरात, कर्नाटक, गोवा येथील विद्यापीठात त्यांनी साहित्य-समाज-संस्कृती विषयक उद्बोधक व्याख्याने देऊन आपल्या वक्तृत्वाचा ठसा अभ्यासकांवर आणि श्रोत्यांवर उमटविलेला आहे.
डॉ सिसिलिया कार्व्हालो या बहुप्रसवा साहित्यिक आहेत. कविता, कथा, ललितगद्य, आस्वादनपर, संशोधनात्मक, बालसाहित्य, लोकसाहित्यविषयक, चरित्रात्मक, आत्मचरित्र, अनुवाद, संपादन-संकलन अशा विविध प्रकारचं लेखन त्यांनी केलेले आहे. साहित्यविषयक लेखनाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी साहित्याच्या विविध क्षेत्रात केलेला संचार थक्क करणारा आहे आई-वडिलांकडून मिळालेली संवेदनशीलता, संघर्षमय परिस्थिती आणि मराठी भाषा-साहित्याचा अभ्यास आपल्या लेखनास कारण ठरलेला आहे. तसेच त्यातून कॅथॉलिक पंथीय मूल्यसंस्कार, मराठी संत साहित्याचा परिचय आणि अभ्यास, दलित साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य यांनी केलेली जाणीव-जागृती, जागतिक साहित्याचा प्रभाव, म्हणजे एकूणच साहित्य, विविध भाषा यांनी युक्त असे साहित्य, त्यातून आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध झालेले आहे, अशी त्यांची धारणा आहे. त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके पुढील प्रमाणे……
टिपंवाणी – Tipawanee (Drops of Water) – 2019
© 2020, Dr.Cecilia Carvalho.